भाऊबीज निधी समर्पण सोहळा

04 Jan 2024 16:15:19

'माझे हात आज श्रीमंत झाले !' - ज्येष्ठ पुरातत्वविद् डॉ. गो. बं. देगलूरकर

कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा भाऊबीज निधी समर्पण सोहळा संपन्न

------------------------------------

'महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्वयंसेवकांनी संकलित केलेला निधी माझ्या हस्ते संस्थेला सुपूर्त केला गेला ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असून माझे हात आज श्रीमंत झाले आहेत' असे हृद्य उद्गार ज्येष्ठ पुरातत्वविद् डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी काढले. संस्थेच्या 'भाऊबीज निधी समर्पण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे माजी आजन्म सेवक कै. गो. म. चिपळूणकर यांच्या कल्पकतेतून सुरू झालेल्या भाऊबीज निधी योजनेला आता १०० वर्षे होऊन गेली. आजही ही योजना अव्याहतपणे चालू असून हजारो गरीब आणि गरजू विद्यार्थिनींना याचा उपयोग होत आहे. प्रतिवर्षी दि. २० डिसेंबर रोजी म्हणजेच कै. गो. म. चिपळूणकर यांच्या स्मृतिदिनी भाऊबीज निधी समर्पण सोहळा संपन्न होत आलेला आहे. या वर्षीदेखील हा सोहळा संस्थेमध्ये संपन्न झाला. डॉ. देगलूरकर यांच्यासह या कार्यक्रमात संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती स्मिता कुलकर्णी, कार्याध्यक्ष श्री. रवींद्र देव, व्यवस्थापक मंडळ सदस्या श्रीमती सीमा कांबळे, सचिव डॉ. पी. व्ही.एस. शास्त्री, उपसचिव श्री. प्रदीप वाजे आणि ज्येष्ठ भाऊबीज स्वयंसेविका श्रीमती मनिषाताई कोपरकर हे मान्यवर उपस्थित होते.

महिलाश्रम‌ शाळेच्या विद्यार्थिनींनी आश्रमगीत गाऊन कार्यक्रमाचा प्रारंभ केला. यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. रवींद्र देव यांनी महर्षी कर्वे यांच्या कार्याचे स्मरण करत भाऊबीज योजनेच्या शतकी वाटचालीचा आढावा घेतला आणि भाऊबीज योजनेचे जनक कै. गो. म. चिपळूणकर तसेच सर्व भाऊबीज निधी स्वयंसेवकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. संस्थने काळानुरुप केलेले बदल आणि या बदलांमुळे समाजाला झालेला लाभ याबाबतही त्यांनी निवेदन केले. समाजाची गरज लक्षात घेऊन निर्माण होत असलेल्या नवनवीन शिक्षणशाखांबाबतही त्यांनी माहिती दिली आणि संस्थेच्या आता ७४ शाखा झाल्याची माहिती त्यांनी दिली.

या प्रसंगी या वर्षी सर्वाधिक भाऊबीज निधी संकलित करणाऱ्या ज्येष्ठ भाऊबीज स्वयंसेविका श्रीमती मनिषाताई कोपरकर यांना आणि संस्थेच्या वृद्धाश्रमात राहून निधी संकलन करणाऱ्या श्रीमती सुशीलाताई आपटे यांना मान्यवरांच्या हस्ते भाऊबीज-निधीचे प्रथम पारितोषिक देण्यात आले. तसेच श्री. शशिकांत भोपटकर यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दिले गेले. मुंबई च्या स्वयंसेविका श्रीमती शैलजा जोशी यांचा तसेच भाऊबीज निधी संकलनाचे काम उत्तमपणे करणा-या विद्यार्थिनींचाही सन्मान संस्थेच्या वतीने यावेळी केला गेला.

श्रीमती मनिषाताई कोपरकर यांनी आपल्या मनोगतात आपण कर्वे संस्थेच्या माजी विद्यार्थिनी असल्याचा अभिमान व्यक्त केला. काम होईल की नाही असे वाटत असतानाही मोठे काम करता आले. हे काम करताना जेव्हा तरुण स्वयंसेवक जबाबदारी घेताना दिसतात तेव्हा समाधान वाटते. नव्याने सुरू झालेल्या डिजिटल कार्यपद्धतीचाही उपयोग होत असल्याचे त्यांनी नमूद केले. भाऊबीज निधी संकलनाचे अनेक अनुभव त्यांनी यावेळी मांडले.

भाऊबीज निधी संकलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनीदेखील आपले अनुभव यावेळी सांगितले. यात कु. अनुष्का कांबळे, कु. वैष्णवी ठाकर. कु. स्वराली बाळापूरकर, कु. ऋता चौधरी या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या सर्वांनीच संस्थेच्या कार्याबद्दल समाजाने केलेल्या कौतुकाबद्दलची माहिती यावेळी सांगितली. महिलाश्रम शाळेच्या सौ. अपर्णा कुलकर्णी यांनी नव्याने सुरु झालेल्या 'कन्यार्थ' या डिजिटल पावती पुस्तकाबाबतचे आपले अनुभव सांगून पुढील पुढील काळात स्वयंसेवकांनी आवर्जून 'कन्यार्थ' चा वापर करावा असे आवाहन केले.

यानंतर संकलित भाऊबीज निधीची थैली प्रमुख अतिथी डॉ. देगलूरकर यांच्या हस्ते कार्याध्यक्ष श्री. रवींद्र देव यांचेकडे औपचारिकरित्या हस्तांतरित केली गेली.

आपल्या मनोगतात सर्व भाऊबीज स्वयंसेवकांचे कौतुक करीत डॉ. देगलूरकर यांनी आपल्याला महर्षी कर्वे अर्थात अण्णांना पाहण्याचे भाग्य लाभले असल्याचे सांगितले.

'भारतरत्न या पुरस्कारावर अण्णांचा पूर्ण अधिकार होता. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत दृढनिश्चयी आणि परखड असे होते आणि त्यात अनेक गुणांचा समुच्चय होता. अण्णांप्रमाणेच सर्वच कर्वे कुटुंबीय कर्तृत्ववान आणि नम्र असल्याचे मी पाहिले. संस्थेचे काम करताना, निधी गोळा करताना अण्णांनी किती नकार पचवले असतील याची गणती नाही. पण स्त्री शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी ओळखलं होतं आणि म्हणूनच स्वतःला त्यांनी या कार्यात समर्पित केलं' असे गौरवोद्गार डॉ. देगलूरकर यांनी काढले. आजचे संस्थेचे काम‌ बघून समाधान व्यक्त करताना समर्पित पदाधिकारी आणि सेवकांच्या बळावर लवकरच संस्थेच्या १०० शाखा होतील असा विश्वासही त्यांनी या प्रसंगी बोलून दाखवला. आपल्या संस्थेच्या कामाव्यतिरिक्तही अण्णांच्या प्रेरणेतून अनेक समाजोपयोगी कामे चालू झाल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

या कार्यक्रमासाठी काही मुंबईच्या भाऊबीज स्वयंसेवकांनीही आवर्जून हजेरी लावली. भाऊबीज निधी समर्पण सोहळ्याचे सूत्रसंचालन व्हिजन इंग्लिश स्कूलच्या श्रीमती कीर्ति गंधे यांनी तर आभार प्रदर्शन व्हिजन स्कूल समूहाच्या प्रमुख श्रीमती कांचन सातपुते यांनी केले.

व्हिजन शाळेच्या विद्यार्थिनींनी गायिलेल्या संपूर्ण वंदे मातरम ने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Powered By Sangraha 9.0