२८ वा ‘बाया कर्वे पुरस्कार’ श्रीमती प्रिन्स उर्फ रंगू सौरिया यांना प्रदान

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे यंदाचा म्हणजेच २८ वा बाया कर्वे पुरस्कार दार्जिलिंग येथे लैंगिक तस्करीविरोधात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवक प्रिन्स उर्फ रंगू सौरिया यांना प्रसिध्द अभिनेते आणि माजी खासदार नितीश भारद्वाज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

“रेड लाईट एरियामध्ये असलेल्या महिला आणि मुली त्यांच्या मर्जीनेच तिथे आल्या आहेत, असा सर्वसामान्यांचा गैरसमज असतो. मात्र, तिथले वास्तव आपल्या समजुतीपेक्षा खूप वेगळे असते. चित्रपट, मालिका किंवा मोबाईलव्दारे महानगरचा तामझाम पाहिलेल्या मुलींना स्वप्न दाखवून, फूस लावून, लग्म करून किंवा पैसै आणि प्रसिद्धीचे अमिष दाखवून मोठ्या शहरांमध्ये आणले जाते. आपण या महिलांविषयी सहवेदना बाळगणे आवश्यक आहे. मात्र, समाजाची मानसिकता आजही मागास आहे आणि या विषयात अद्याप बरेच काम होणे बाकी आहे” अशी खंत दार्जिलिंग येथे लैंगिक तस्करीविरोधात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवक प्रिन्स उर्फ रंगू सौरिया यांनी या प्रसंगी व्यक्त केली.

संस्थेच्या डॉ. भानुबेन नानावटी वास्तुशास्त्र महाविद्यालय सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास, सचिव पी. व्ही. एस. शास्त्री,  उपाध्यक्षा स्मिता कुलकर्णी , बाया कर्वे पुरस्कार निवड समिती सदस्य डॉ. आनंद काटिकर, संस्थेच्या उपकार्याध्यक्षा विद्या कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात बाया कर्वे लिखित ‘माझे पुराण’ या मूळ मराठी पुस्तकाच्या ‘मेरी गाथा’ या हिंदी आणि ‘द सागा ऑफ माय लाइफ’ या इंग्रजी अनुवादाचे तसेच बाया कर्वे पुरस्कारप्राप्त महिलांच्या कार्यावर आधारित ‘कर्त्या करविता’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलताना रंगू सौरिया म्हणाल्या, ‘पुण्याशी माझे ऋणानुबंध आहेत. जेव्हा मुलींची मी या ठिकाणाहून सुटका केली, त्यावेळी मला पुण्यातील पोलीसांचे खूप सहकार्य मिळाले. पुण्याच्या मातीशी माझे ऋणानुबंध आहेत. लैंगिक तस्करी हा विषय केवळ मुलींच्या तस्करीशी संबंधित नसून मुलांची देखील तस्करी केली जाते. मात्र भारताचा विचार करता  तरूण मुलींची तस्करी करण्याचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यातून तस्करीचे प्रमाण जास्त आहे. इतर राज्यांचा विचार केला तर कोलकात्तामधील सोनागाची येथे मोठा रेडलाईट एरिया आहे, हे आपल्याला माहितच आहे. अशा ठिकाणी जाऊन मी तिथून मुलींची सुटका करते. आमच्यासारखे लोक जीवाचे रान करून, स्वतःच्या आजारपणापासून अनेक वैयक्तिक गोष्टी बाजूला ठेवून आणि प्रसंगी जीवाची बाजी लावून या मुलींची सुटका करतो, मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांचे कुटुंब आणि समाज त्यांचा योग्य प्रकारे स्वीकार करीत नाही. चंद्राची शीतलता किंवा सूर्याची किरणे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, हे दुर्दैव आहे. कुटुंब आणि समाजाने त्यांचा स्वीकार करून त्यांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. या वर्षी माझा पाय दुखावलेला असून मी सहा राज्यांमधून मुलींची सुटका केली. शाळेत असल्यापासून मला दुसऱ्यांची सेवा करण्याची आणि इतरांना मदत करण्याची आवड होती. महाविद्यालयात असताना देखील मी अनेकांना मदत केली. पहिल्या प्रयत्नातच माझी पोलीस विभागात निवड झाली. पण त्याच्या प्रशिक्षणासाठी कोलकात्ताला जावे लागणार होते. पण काही कारणामुळे मी गेले नाही. त्यानंतर मी काही काळ शाळेत काम केले. पण मला आव्हानात्मक कामाची आवड होती, कारण कठीण कामात यश मिळवण्याचा आनंद मोठा असतो. एका छोट्याशा गावात मी रहायचे. तिथे चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या लोकांच्या समस्या आजही तशाच कायम आहेत. तिथे खूप कष्ट करणाऱ्या महिला मी लहानपणापासून पाहिल्या. त्यातूनच महिलांसाठी आणि विशेषतः मुलींसाठी काम करण्याचा निर्णय मी घेतला. केवळ मुलींच्या तस्करीसंदर्भात मी काम करीत नाही, तर कौटुंबिक हिंसा, महिलांवरील अत्याचार याही गोष्टीत मी काम  करते आहे. मी भूत आणि भविष्याचा विचार न करता वर्तमानाचा विचार करून कार्य करते. कारण भूत  आणि भविष्यामध्ये अडकून पडलो, तर आपण काम करू शकणार नाही, असे मला वाटते. महर्षी कर्वे यांनी   बालविवाहाविरोधात कार्य केले, त्यामुळे आजचा पुरस्कार मला खूप प्रेरणा देणारा आहे. कारण कर्वेंनी आपल्याला मोलाची शिकवण दिली आहे. त्यांच्या आशीर्वादांची शिदोरी मी घेऊन जात आहे.

प्रमुख अतिथी या नात्याने बोलताना नितीश भारद्वाज यांनी श्रीमती रंगू सौरिया यांचा गौरवपूर्ण उल्लेख करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, ‘कुरूक्षेत्र कायम जीवनाचे प्रतीक राहिले आहे. पण धर्मासाठी जेव्हा जीवनाचे कार्य हाती घेतले जाते, तेव्हा कुरूक्षेत्राचे रूपांतर धर्मक्षेत्रात होते. महर्षी कर्वे यांच्यासारख्यांनी सामाजिक सेवेचा बोध समाजाला दिला. जे लोक समाजाच्या चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करतात, त्यातून समाज खऱ्या अर्थाने उन्नत होतो आणि असे कार्य करणाऱ्या व्यक्तीच महापुरूष म्हणून ओळखले जातात. नरकासूराचा वध करून श्रीकृष्णाने त्याच्या तावडीतून मुलींची सुटका केली. आजच्या पुरस्कारार्थी रंगू सौरिया श्रीकृष्णाचे हेच कार्य करीत आहेत.’

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थिनी यांनी हे काम समजून घेत असा समर्पित भाव आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपकार्याध्यक्षा विद्या कुलकर्णी यांनी केले. प्रांजली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा स्मिता कुलकर्णी यांनी आभार मानले. वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.

No announcement available or all announcement expired.