साताऱ्यात झालेला आगळा वेगळा शेतकरी मेळावा

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे यांचे बाया कर्वे वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (बीकेव्हीटीआय), सातारा – शेती विभाग व महाराष्ट्र शासन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. २१ नोव्हेंबर २०२३ रोजी कन्या शाळा सातारा येथे शेतकरी मेळावा – कार्यशाळा व प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. सदर शेतकरी मेळाव्यासाठी सुयश चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांचे ट्रस्टी माननीय एम एन कोंढाळकर तसेच प्रबंधक माननीय शेखर जी म्होकर, हे मान्यवर उपस्थित होते. तसेच डी आर डी ओ चे जिल्हा समन्वयक माननीय सुरजजी पवार यांनी डीआरडीओचे शेतकरी मेळाव्यामध्ये प्रतिनिधित्व केले. मध संचलनालय, महाराष्ट्र शासन हेही आपल्या शेतकरी मेळाव्यामध्ये सहभागी झाले.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने कार्याध्यक्ष रवींद्र देव यांनी संस्थेच्या वतीने व्यक्त केलेली शेतीविषयक उपक्रमांबाबतची सकारात्मकता व आश्वासकता सर्व प्रशासकीय विभागांना तसेच शेतकरी बांधवांना प्रचंड सकारात्मक ऊर्जा देऊन गेली. तसे अभिप्रायही अनेकांनी आवर्जून नोंदविले.

या शेतकरी मेळाव्यामध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने शेतकरी बांधव तसेच शेतकरी उद्योजक व शेती पूरक व्यवसायासंबंधित उद्योग व्यवसायिक असे तीनही प्रभाग चर्चासत्रासाठी एकत्रितरित्या एकाच व्यासपीठावर बोलाविण्याचा हेतू यशस्वीरित्या साध्य झाला. यामुळे शेतकरी बांधवांच्या समस्या, उद्योजकांच्या समस्या तसेच मोठ्या प्रमाणावर शेती उद्योग विस्तारित करण्यासाठीची चर्चा, संधी, एकमेकांसाठी पूरक राहून प्रगती साधण्यासाठीची प्रयत्नशीलता व त्या अनुषंगाने प्रायोगिक तत्त्वावर रचनात्मक कामाची उभारणी कशी करता येईल असे अनेक विषय मेळाव्यामध्ये घेण्यात आले. काही  शेतकऱ्यांच्या उद्योगगाथा या मेळाव्यामध्ये सर्वांना ऐकायला मिळाल्या.

या ठिकाणी लावलेल्या प्रदर्शनीमध्ये बरेचसे अग्रो प्रोसेसिंग व फूड टेक्नॉलॉजीशी संबंधित प्रॉडक्टसचे स्टॉल्स लावण्यात आले होते. या सर्व स्टॉल्सवर उपस्थितांनी खरेदीचा आनंदही घेतला. या स्टॉल धारकांना काही आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित प्रशिक्षणाची गरज आहे. त्यांनीही या मेळाव्याबद्दल समाधान व्यक्त केले. कृषी विज्ञान केंद्रा मार्फत सहभागी शास्त्रज्ञांनी कार्यशाळेदरम्यान पीक संरक्षण, मृदा व्यवस्थापन व निरीक्षण, प्रयोगशाळेचे महत्त्व, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विषयक संकल्पना उपाययोजना, कृषी विभाग संलग्नता, कृषीमाल प्रक्रिया उद्योग, शेती पूरक उद्योग उभारणी इत्यादी विषयांवर सत्रे घेतली. सेंद्रिय शेती, देशी बियाणे, भारतीय तृणधान्ये हे तीन ठळक मुद्देही मिळाव्यामध्ये समाविष्ट होते.

साधारणतः ७० ते ८० शेतकर्यांनी या शेतकरी मेळाव्याचा लाभ घेतला. शेतकर्यांसोबतच्या स्नेहभोजनाने  कार्यक्रमाला आपुलकीची ऊब मिळाली, संस्थेचा लाभलेला हा सहज सहवास शेतकऱ्यांना सुखावला. हा शेतकरी मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आदरणीय दत्ताजी थोरात सर, शेती विभाग प्रकल्प प्रमुख  गणेशजी मेळावणे, टीम बीकेव्हीटीआय- सातारा, मा. सुरेखा दौंडे, (मुख्याध्यापिका,कन्या शाळा सातारा), कन्या शाळेचा संपूर्ण सेवक वर्ग तसेच सातारा परिसरातील व्यापारी वर्ग यांनी हातभार लावला.

No announcement available or all announcement expired.