श्रीमती बुधरी ताती यांना बाया कर्वे पुरस्कार प्रदान

—————————————————–
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने दर वर्षी दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील ‘बाया कर्वे पुरस्कार’ या वर्षी छत्तीसगढ राज्यातील नक्षलग्रस्त भागात महिला सशक्तीकरणाचे कार्य करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती बुधरी ताती यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते नुकताच प्रदान केला गेला. सदर पुरस्कार कर्वे संस्थेच्या कार्यात मोलाचे योगदान असलेल्या महर्षी कर्वे यांच्या धर्मपत्नी स्व. आनंदीबाई तथा बाया कर्वे यांच्या नावे दिला जाणारा हा पुरस्कार बाया कर्वे पुण्यतिथिदिनी म्हणजेच (मंगळवार) दि. २९ नोव्हेंबर या दिवशी प्रदान केला गेला. या पुरस्काराचे हे २७ वे वर्ष आहे.
या पुरस्कार सोहळ्याच्या प्रारंभी व्हिजन इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी गायिलेल्या संस्थेच्या ‘आश्रमगीता’नंतर संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. रवींद्र देव यांनी प्रास्ताविक मांडले. ‘बाया कर्वे यांचे संस्था उभारणीतील योगदान असामान्य असून त्यांच्या नावे श्रीमती बुधरी जी यांच्यासारख्या अनेक कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरवान्वित करण्याची संधी मिळणे ही संस्थेसाठी आनंददायी बाब आहे’ असे ते म्हणाले. यानंतर पुनरुत्थान समरसता गुरुकुलाचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे औपचारिक स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. रवींद्र देव यांनी केले. या वर्षीच्या ‘बाया कर्वे’ पुरस्कारार्थींची निवड राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय संपर्कप्रमुख श्रीमती पौर्णिमा शर्मा, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव श्री. सुधीर गाडे आणि कर्वे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती स्मिता घैसास यांच्या त्रिसदस्यीय समितीने केली. संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती स्मिता कुलकर्णी यांनी या समिती सदस्यांचा परिचय यावेळी करून दिला व नंतर या सर्वांचेही औपचारिक स्वागत केले गेले. या समितीच्या सदस्या श्रीमती पौर्णिमा शर्मा यांनी नंतरच्या कालांशात पुरस्कारार्थी निवड-प्रक्रियेबद्दल आपले प्रातिनिधिक मनोगत मांडले आणि निर्वाचित पुरस्कारार्थी श्रीमती बुधरी ताती यांचा परिचयही करून दिला. या परिचयाला जोडून लगेचच श्रीमती बुधरीजी यांच्या जीवनकार्यावर आधारित एक चित्रफीत दाखवली गेली.
यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. गिरीश प्रभुणे आणि संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती स्मिता घैसास यांच्या हस्ते श्रीमती बुधरी ताती यांना २०२२ सालचा ‘बाया कर्वे पुरस्कार’ प्रदान केला गेला. ‘महर्षी कर्वे यांच्या पुण्यभूमीत बाया कर्वे यांच्यासारख्या समर्पित आणि कर्तृत्ववान महिलेच्या नावाने हा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे’ असे उद्गार श्रीमती बुधरी ताती यांनी या सन्मानाला उत्तर देतेवेळी काढले. या प्रसंगी त्यांनी आपला जीवनप्रवास सर्वांपुढे उलगडला. ‘वयाच्या १५ व्या वर्षीच आपल्या समाजासाठी जीवन समर्पित करण्याची शपथ घेऊन राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून प्रशिक्षित होऊन त्यांनी बस्तर, दांतेवाडा या आदिवासी क्षेत्रात आपले कार्य सुरू केले. सुमारे ४०० गावांत अविरत पायपीट, स्थानिकांचा विश्वास जिंकण्याचे आव्हान, तेथील महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी शिवणकाम, विणकाम, कुटीरोद्योग इ. कौशल्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था, घराघरांमधून आरोग्याचे प्राथमिक धडे देताना केलेली जीवतोड मेहनत, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींची भीषणता अशा विविध अनुभवांचे जिवंत सादरीकरण श्रीमती बुधरीजी यांनी यावेळी केले. ‘आमच्याकडे धन नव्हते, पण मन मात्र होते आणि त्याच बळावर आम्ही हे काम पुढे नेऊ शकलो. आज जेव्हा मोठ्या पदांवर पोहोचलेले अनेक विद्यार्थी/विद्यार्थिनी ‘आपण दीदींमुळे घडलो’ असे सांगतात तेव्हा ते समाधान शब्दांत न सांगता येणारे असते, असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. गिरीश प्रभुणे यांनी आपल्या मनोगतात ‘महर्षी कर्वे आणि बाया कर्वे यांच्या कार्याचा गौरव करीत ‘बाया कर्वे पुरस्कार’ या उपक्रमाबद्दल विशेष समाधान व्यक्त केले. ‘बुधरी ताती आणि त्यांच्या उपस्थित सहकारी शांतीदीदी यांच्या क्षेत्रात मला प्रत्यक्ष जाण्याचा योग आला आणि या भगिनींजवळ असलेले ज्ञान पाहून मला थक्क व्हायला झालं. वनांत राहून ज्ञानार्जन करणाऱ्या ऋषी-मुनींचे वंशज असलेल्या या महिला आहेत. या माता-भगिनी म्हणजे साक्षात भारतमातेचे मूर्त स्वरूप आहेत’, अशा शब्दांत श्री. प्रभुणे यांनी श्रीमती बुधरी जी आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला.
संस्थेचे सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री यांनी आभारप्रदर्शन केले तर व्हिजन इंग्लिश स्कूल च्या श्रीमती सुवर्णा तांबे यांनी सूत्रसंचालन केले. ‘संपूर्ण वंदे मातरंम’ गायनाने या सोहळ्याची सांगता झाली.
No announcement available or all announcement expired.