दि. १९ सप्टेंबर २०२२ या दिवशी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. श्री. भगतसिंह कोश्यारी यांनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती स्मिता घैसास, उपाध्यक्ष श्री. सागर ढोले पाटील, कार्याध्यक्ष श्री. रवींद्र देव, उपकार्याध्यक्षा श्रीमती विद्या कुलकर्णी, व्यवस्थापकीय मंडळ सदस्य श्री. अॅड. प्रभाकर सोनपाटकी, श्री. जयंत इनामदार, श्री. सीए. अभय कुलकर्णी, श्री. अॅड. संदीपक फडके, श्रीमती सीमा कांबळे, आजन्म सेवक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधुरी खांबेटे, संस्थेचे सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री आणि उपसचिव श्री. प्रदीप वाजे तसेच वास्तुव्यवस्था विभागाचे प्रमुख श्री. श्रीपाद कुलकर्णी आणि महिलाश्रम वसतिगृहाच्या प्रमुख श्रीमती सुमन यादव हे मान्यवर उपस्थित होते.
या अनौपचारिक दौऱ्यात महामहीम राज्यपाल महोदयांनी प्रथम संस्थेच्या मुख्य आवारातील भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या समाधी स्थळाला अभिवादन केले व महर्षी कर्व्यांच्या जीवनाशी निगडित संग्रहालयाला भेट दिली. यानंतर संस्थेच्या परिसराची पाहणी करताना प्रथम संस्थेतील वास्तुशास्त्र महाविद्यालय, ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत चालविली जात असलेली संपदा बेकरी आणि संस्थेची प्रथम वास्तु असलेली ‘कर्व्यांची झोपडी’ या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. या सदिच्छा भेटीदरम्यान मा. राज्यपाल महोदयांना महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्र ‘लुकींग बॅक’ भेट स्वरूपात देऊन त्यांचा सन्मान केला गेला.
‘ज्या महापुरुषांनी भारतात युगपरिवर्तनाचे महान कार्य केले, त्यात महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे स्थान अग्रिम आहे. कारण विधवा पुनर्वसन, स्त्री शिक्षण या क्षेत्रांत अनमोल असे काम करून स्त्री शक्तीस नवजीवन देण्याचे महर्षी कर्वे यांनी केलेले कार्य अद्भुत आणि प्रशंसनीय आहे’ या शब्दांत मा. राज्यपालांनी महर्षी कर्वे यांचा गौरव केला आणि या पवित्र परिसराचे दर्शन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून संस्थेच्या पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या.