महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत ‘प्राचीन भारत’ त्रिमितीय नकाशाचे अनावरण

पुणे, दि. २८ : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मुख्य आवारामधील रमा-पुरुषोत्तम विद्यासंकुलात’ ‘प्राचीन भारताच्या संस्कृतीची आणि भौगोलिक व्याप्तीची माहिती देणारे भव्य त्रिमितीय मानचित्र’ उभारण्यात आले आहे. या नकाशाचे औपचारिक अनावरण नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील आणि महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडले. या वेळी सोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह श्री. बाळासाहेब चौधरी, क्षेत्र प्रचारक श्री. अतुल लिमये, प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव हे मान्यवरही उपस्थित होते. संस्थेच्या वतीने कार्याध्यक्ष श्री. रवींद्र देव, व्यवस्थापक मंडळ सदस्य वैद्य. धनंजय कुलकर्णी, श्री. मिलिंद लेले आणि सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

सामाजिक कार्यकर्ते श्री. धनंजय चंद्रात्रे यांच्या संकल्पनेतून शिल्पकार श्री. हृषीकेश राऊत यांनी हा त्रिमितीय नकाशा साकारला असून तो सुमारे दीडशे चौरसफुट आकाराचा आहे. प्राचीन भारतातील विद्यापीठे, पर्वतरांगा, नद्या, ज्योतिर्लिंग, चारधाम, शक्तिपीठे, कुंभस्थान इत्यादी ठिकाणे, विविध प्रदेश व गावांची प्राचीन नावे या नकाशामध्ये दाखविण्यात आलेली आहेत. याद्वारे प्राचीन काळातील भारताच्या भौगोलिक व सांस्कृतिक वैभवाची ओळख सर्वांना होत आहे.

उद्घाटनप्रसंगी श्री. धनंजय चंद्रात्रे यांनी या नकाशाबाबत मान्यवरांना माहिती दिली. ‘भारतीय संस्कृती महान व अतिप्राचीन असून तिची ओळख नव्या पिढ्यांना होणे ही सार्वकालिक गरज आहे. ज्या संस्कृतीचे आपण सर्व जण वारसदार आहोत, त्याबद्दल यथासांग माहिती होण्यासाठी हे मानचित्र अत्यंत उपयुक्त ठरेल आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान दर्शकांच्या मनात उत्पन्न होईल. या उपक्रमाचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांनी व भेट देणाऱ्या सर्वांनीच करून घेतला पाहिजे’ असे विचार मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या व या मानचित्राचा लाभ सर्वांना होईल असा विश्वास व्यक्त केला. तत्पूर्वी संस्थेचे साहित्य देऊन सर्व मान्यवरांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे उपसचिव श्री. प्रदीप वाजे यांनी केले. या उद्घाटन समारोहानंतर हे मानचित्र आता संस्थेतील सर्व विद्यार्थी, अन्य शाळांतील विद्यार्थी व सर्व भेट देणाऱ्यांसाठी आता खुले झाले आहे.

No announcement available or all announcement expired.