देणगीदार आणि सभासद स्नेहमेळावा
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सभासद आणि विविध स्तरांतील देणगीदार यांचा एक स्नेहमेळावा नुकताच म्हणजे रविवार दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १ या वेळात संस्थेच्या रमा-पुरुषोत्तम शैक्षणिक संकुलातील अॅंफीथिएटरमध्ये संपन्न झाला. या मेळाव्यास देणगीदार-सभासदांनी मोठा प्रतिसाद दिला.
आनंदीबाई कर्वे शाळेच्या विद्यार्थिनींनी गायिलेल्या आश्रमगीतानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेच्या उपकार्याध्यक्षा श्रीमती विद्या कुलकर्णी यांनी संस्थेच्या सध्याच्या कामाचे व्यापक स्वरूप एका सादरीकरणाद्वारे सर्वांसमोर मांडले. यात संस्थेचा भौगोलिक विस्तार, नवनवीन अभ्यासक्रम, कामशेत येथील वनवासी विद्यार्थ्यांसाठी चालू असलेले विशेष कार्य, संस्थेला मिळालेले आणि संस्थेने दिलेले पुरस्कार इ. बाबींचा समावेश होता. यानंतर संस्थेचे सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री यांनी संस्थेने कोविड साथीच्या कालावधीत केलेले काम, विविध देणग्यांच्या आधारावर यशस्वीपणे राबविलेले प्रकल्प आणि भविष्यकाळातील संस्थेच्या गरजा याबद्दलची माहिती सर्वांपढे सादर केली.
गरजू विद्यार्थिनींसाठी गेली शंभर वर्षे राबविल्या जाणाऱ्या भाऊबीज निधीबाबत संस्थेच्याच ‘स्कूल ऑफ मेडिया’ने तयार केलेला एक लघुपट यानंतर सर्वांना दाखविण्यात आला. एका भावाने दिलेल्या भाऊबीजेचा बहिणीच्या आयुष्यावर किती व्यापक परिणाम होऊ शकतो हे प्रभावीपणे सांगणारी केवळ साडेसात मिनिटांची ही चित्रफीत सर्वांनाच अंतर्मुख करून गेली. (या लघुपटाची यु ट्यूब लिंक सोबत दिली आहे.)
देणगीदारांपैकी काही जणांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांनीच संस्थेच्या व्यापक आणि समाजोपयोगी कार्याला मनमोकळी दाद देत यापुढेही सर्व प्रकारची मदत करीत राहण्याचे आश्वासन दिले. संस्थेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य सीए श्री. अभय कुलकर्णी यांनी शेवटी आभारप्रदर्शन केले आणि पार्वतीबाई आठवले शाळेच्या विद्यार्थिनींनी गायिलेल्या ‘वंदे मातरम्’ ने औपचारिक कार्यक्रमाची सांगता झाली तर नंतरच्या स्नेहभोजनाने अनौपचारिक मेळाव्याची सांगता झाली.
एम. बी. ए. कॉलेजच्या श्रीमती सुवर्णा ढमढेरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.