माजी विद्यार्थिनी आणि शिक्षक मेळावा
‘अण्णासाहेब कर्वे यांच्या ऋणामधून मुक्त होण्यासाठी त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करणे आणि स्त्री शिक्षणाच्या कार्यात सक्रीय योगदान देणे, हाच एक उत्तम मार्ग आहे’ असा संदेश स्वरूपवर्धिनीचे कार्याध्यक्ष मा. श्री. रामचंद्र डिंबळे यांनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थिनी व शिक्षक मेळाव्याद्वारे दिला. हा मेळावा शनिवार दि. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० ते ६ या वेळात संस्थेच्या रमा-पुरुषोत्तम शैक्षणिक संकुलातील अॅंफीथिएटरमध्ये संपन्न झाला. या मेळाव्यास एकूण १३३९ माजी विद्यार्थिनी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली. या सर्वांना संस्थेच्या वतीने आगामी दीपावलीच्या पार्श्वभूमीवर पणत्यांची अनोखी भेट देण्यात आली.
सामूहिक आश्रमगीतानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेच्या उपकार्याध्यक्षा श्रीमती विद्या कुलकर्णी यांनी संस्थेच्या सध्याच्या कामाचे व्यापक स्वरूप एका सादरीकरणाद्वारे सर्वांसमोर मांडले. यात संस्थेचा भौगोलिक विस्तार, नवनवीन अभ्यासक्रम, कामशेत येथील वनवासी विद्यार्थ्यांसाठी चालू असलेले विशेष कार्य, संस्थेला मिळालेले आणि संस्थेने दिलेले पुरस्कार इ. बाबींचा समावेश होता. यानंतर संस्थेचे सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री यांनी संस्थेने कोविड साथीच्या कालावधीत केलेले काम, विविध देणग्यांच्या आधारावर यशस्वीपणे राबविलेले प्रकल्प आणि भविष्यकाळातील संस्थेच्या गरजा याबद्दलची माहिती सर्वांपढे सादर केली.
गरजू विद्यार्थिनींसाठी गेली शंभर वर्षे राबविल्या जाणाऱ्या भाऊबीज निधीबाबत संस्थेच्याच ‘स्कूल ऑफ मेडिया’ने तयार केलेला एक लघुपट यानंतर सर्वांना दाखविण्यात आला. एका भावाने दिलेल्या भाऊबीजेचा बहिणीच्या आयुष्यावर किती व्यापक परिणाम होऊ शकतो हे प्रभावीपणे सांगणारी केवळ साडेसात मिनिटांची ही चित्रफीत सर्वांनाच अंतर्मुख करून गेली. (या लघुपटाची यु ट्यूब लिंक सोबत दिली आहे.) या प्रसंगी श्रीमती जयश्री लेले या पन्नाशीच्या दशकातील माजी विद्यार्थिनी आणि श्रीमती संजीवनी कर्वे या माजी शिक्षिका यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मनोगतांद्वारे महर्षी कर्वे, बाया कर्वे यांच्याबद्दल आणि इथल्या वास्तव्याबद्दल असणारा कृतज्ञतेचा भाव सर्वांसमोर प्रकट झाला.
विशेष अतिथि म्हणून आपले मनोगत मांडताना श्री. रामभाऊ डिंबळे यांनी महर्षी कर्वे यांच्या पुण्यभूमीत यायला मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. श्री. रामभाऊ हे स्वत: ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेले व ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक स्व. अप्पासाहेब पेंडसे यांचा परीसस्पर्श लाभलेले एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. हाच संदर्भ घेऊन त्यांनी अशा महापुरुषांचे समाजासाठी असणारे योगदान विशद केले. ‘श्री. अप्पासाहेब पेंडसे यांना जेव्हा काही वस्तुरूपात गुरुदक्षिणा देण्याची माझी इच्छा झाली तेव्हा तेव्हा त्यांनी ती नाकारली आणि त्याऐवजी या कामासाठी आपले जीवन पणाला लावण्याचे आवाहन मला केले आणि मीही त्यानुसार काम करत गेलो’ असे सांगून श्री. रामभाऊ यांनी सर्व माजी विद्यार्थिनींना संस्थेच्या भाऊबीज निधीसारख्या पवित्र कार्यात स्वत:ला झोकून देण्याचे आवाहन केले. जुन्या मैत्रिणींना भेटायला आणि त्यांच्याशी गप्पा मारायला सर्वांनाच आवडते. भाऊबीज निधी गोळा करण्यासाठी अशा जुन्या मैत्रिणींचे गट केल्यास निधी संकलन आणि भेटीगाठी अशी दोन्ही कामे साध्य होऊ शकतात, अशीही आग्रही सूचना त्यांनी केली.
संस्थेचे उपसचिव श्री. प्रदीप वाजे यांनी आभारप्रदर्शन आणि महिलाश्रम शाळेच्या शिक्षिका श्रीमती अपर्णा कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पार्वतीबाई आठवले शाळेच्या विद्यार्थिनींनी गायिलेल्या ‘वंदे मातरम्’ ने औपचारिक कार्यक्रमाची सांगता झाली. तत्पश्चात अल्पाहार आणि खूप सारे चैतन्य सोबत घेऊन सर्व माजी विद्यार्थिनी/शिक्षकांचा हा मेळा स्वस्थानी परतला.